Advertisements

Tirip

Advertisements

तिरीप


तिरीप

लेखिका-तबस्सुम काशीद

सकाळच्या वेळी उन्हाचे कोवळे किरण घेऊन हळूच खिडकीतल्या झडपेतून घरात येणारी तिरीप..

रात्रीचा अंधकार संपला असल्याची जाणीव करून देणारी ही प्रकाशमान शलाकाच जणू.

झाडाझुडुपांतून तर कधी कौलातून डोकावत जमिनीवर विविध प्रकाशाची नक्षी काढणारी तिरीप

किती तरी रूपे तिची किती तरी तऱ्हेने भेटे ती मज आवडे ही तिरीप ..

गुलमोहोरच्या बुंध्याला टेकून पुस्तकातल्या विश्वात रमून गेली होती ती.

पुस्तकातील ती कोवळी तिरीप आता कथेतून निघून तिच्या गालाशी खेळू लागली होती कधीपासून ..

अन तिच्या मोहक चेहऱ्यावर वेगवेगळ्या अँगलनी नक्षी काढत तिला आपल्या येण्याची जाणीव करून देत होती.

डोळ्यांवर तिरीप येताच तिने आपला गोरापान तळवा कपाळावर उलटा ठेवून वर पाहिले.

अन खुदकन हसून म्हणाली, आलीस का तू मला उठवायला?

तिरीप ने मग थोडे वरखाली करून तिला प्रतिसाद दिला.

तशी तिने ही तिला वाकुल्या दाखवत पुस्तक मिटले व ती उठली..

आणि अवखळ वाऱ्यासारखी घरात शिरली व पटकन चप्पल पायात अडकवून म्हणाली की मी येते ग!!

आई लगेच पुस्तक बदलून आले.सायकलवर बसताना आईची मागून मारलेली हाक तिने ऐकली

व तशीच सायकल तिने पुढे वळवली.वेळेत नाही पोहचली तर ते काका लायब्ररी बंद करतील.

ह्या धास्तीने तिने मोजून तीन मिनिटांत तेवढे अंतर पार केले काका तिची वाटच पाहत होते

तिने कलेम लावलेले पुस्तक टेबलावरच होते ते पाहून ती हरकून गेली व

पटकन रजिस्टर वर सही करून पुस्तक ताब्यात घेतले व Thank You काका म्हणत हवेसारखी पसार ही झाली.

काकांना बोलायची संधी ही मिळाली नाही ती तरी काय करणार आईने तिला पोस्टऑफिसला जायला सांगितलेले होते व

ते ही बंद व्हायला केवळ पाचच मिनटं उरले होते.

तिने पटकन काही पत्रे काही स्टॅम्प आणि काही आंतरदेशीय पत्रे घेतली व

निघताना पोस्टाची पेटी पाहू लागली. तर तिला तिच्या नावाचे एक जड लागेल असे पार्सल दिसले

वेळ नव्हता म्हणून तिने सर्व पसारा उचलला व घरी आली आईच्या ताब्यात पत्रे देऊन

तिने आपले पार्सल व पुस्तक घेऊन आपली रूम गाठली. पार्सलच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव होते चेतन झेंडे.

मध्येच हे काय म्हणून तिने उघडून पाहिले तर आत मध्ये हातीम ताईंचे छोटेसे पुस्तक होते.

म्हणजे अजून ही तो विसरला नव्हता तर.. ती विचारत पडली….विसरण्यासारखी नव्हतीच ती.

झाडे पाने फुले पक्षी निसर्गाशी सवांद साधणारी अशी सोळा सतरा वर्षाची सुंदर नवतरुणी.

जीवनरसाने, चैतन्याने, उत्साहाने भरलेली. दिसायला अत्यंत देखणी. देवानेही सढळ हाताने सौंदर्याचे दान तिला दिले होते.

सोन पिवळे वर्ण, चमकणारी कांती, निळसर छटा घेतलेले ते तिचे काळेभोर भरघोस केस,

आणि चंद्रासारखा गोल चेहरा छोटी जीवनी.सडसडीत बांध्याची लाजरी बुजरीशी अशी नाव ही होते

तिचे तिच्यासारखेच गोड मधु!मधुरा! मधु राणी !सर्वांची राणी !!

देवाने नुसतेच रूपच नव्हते दिले तिला तर गुणांची ही ती खाण होती ब्युटी आणि टॅलेंटचे छान मिश्रण होते तिच्यात.

सर्वगुणसंपन्न होती ती. नावाप्रमाणेच तिच्या वागण्या बोलण्यात एकप्रकारचा गोडवा होता

कोणालाही आपलंसं करणारा दुर्मिळ असाआपलेपणा होता.

समजुतदारपणा आणि प्रसंगावधान हे तर तिचे नेमके गुण होते.

पुस्तकच जग होते तिचे. पुस्तकवेडी होती ती त्या दुनियेत हरवून जाई.

त्यापायी किती ओरडा ही खाई खरी. पण तरी ती अभ्यासात हुशार होती.

पहिल्या पाचात येणारी स्कालर अशी विद्यार्थिनी होती. शाळेत सर्वच बाबतीत तिचा अव्वल नंबर असायचा.

गदरिंगला ती हवी असायचीच तसेच वक्तृत्व स्पर्धा असो की निंबध स्पर्धा तिच्या शिवाय जमत नसे.

मैत्रिणीच्या गळ्यातील तर ती ताईत होती. घरी ही सर्वांची लाडकी होती आई तर तिला एका कामाला हात लावू देत नसे

आणि बाबा रोज बालुशाही आणि सोनचाफ्याची दोन फुले तिच्यासाठी न चुकता आणीत असे.

ती ही ती फुले रोजच केसांत माळत असे.

छोटासाच परिवार होता तिचा आई वडील अन वयात दोनेक वर्षाचे अंतर असलेला

तिच्या सारखाच गोड तिचा लहान भाऊ तिचा लाडका राजू खरे नाव माधव.

त्याचे सगळे करायला तिला फार आवडे. त्याचा रोजचा अभ्यास ही न चुकता ती घेतअसे.

S S C ला होता तो. तेंव्हा आता सारखे ट्युशन चे फॅड नव्हते.

राणी ही HS C ला होती तरी स्वतःचा अभ्यास सांभाळून ती त्याचा अभ्यास घेत असे

एवढेच न्हवे तर आजूबाजूच्या वस्तीतील गरीब मुले ही तिच्याकडे ट्युशनला येत असे

दहावीनंतर हौस म्हणून तिने शिकवणी घ्यायला सुरुवात केली होती. तीच आता तिची आवड झाली होती.

मुळात तिला आवडायचे कोणाच्या ही मदतीला धावून जायला.

त्यावेळेस दूरदर्शन वर नुककड ही मालिका लागायची त्यातील दीदी नावाचे वलय तिच्या नकळत तिला चिटकले व

ती साऱ्यांची ट्युशन दीदी झाली. राजुचे मित्र ही येत असे अभ्यासाला प्रदीप, मनोज आणि चेतन…चिंटू !

चशमिश मोठ्या डोळ्यांचा थोडा घुम्या असा हा चेतन उर्फ चिंटू मात्र तिला कधीच दीदी म्हणत नसे.

तिच्याही कधी ते लक्षात नाही आले. उलट घरात त्याला सावत्र वागणूक मिळे

म्हणून राणी त्याची विशेष दखल घेत असे जास्त आपलेपणाने वागत असे त्याची विचारपूस करी

त्याला बोलते करी पण तो बोलत नसे चोरून मात्र तिला पाहत असे…

त्यादिवशी ही ते अभ्यासाला बसले होते व त्याची नजर तिच्या चेहेऱ्यावर सारखी जात होती व तिथेच हरवत होती.

गालावर रुळणाऱ्या कुरळ्या बटा कानामागे करताना होणारी तिची मोहक हालचाल वेड लावी जीवा

असे काहीसे होत होते तिने पाहिले की तो नजर चोरत असे. तिच्या ते एकदोन वेळेस लक्षात आले.,

पण तिने दुर्लक्ष केले कारण त्याच्या वागण्या बोलण्यात कधीच काही खटकल्या सारखे नव्हते.

सर्वांशी हातचे राखून वागे. पण तिच्या आवडीनिवडी मात्र कटाक्षाने जपत असे.

कुठे कुठले पुस्तक मिळाले गाण्याची नवीन कॅसिट आली की तो तिला देऊन जाई

तिला ही ते घेताना काही वावगे वाटत नसे.दिवस सरत होते. मध्यंतरी ते सर्व दुसरीकडे शिफ्ट झाले होते व

तोही दहावी नंतर डिप्लोमासाठी शहरातच दूर एम आय डी सी एरियात एका नामवंत कंपनीत डिप्लोमा साठी गेला होता

नव्हे त्याला पाठविण्यात आले होते त्याच्या आईचे त्याच्या भविष्याचे वेगळे प्लॅन होते स्वप्न होते.

आणि या सहा महिन्यात त्याचा कोणाशीच काहीच संपर्क झालेला नव्हता

राजू व त्याच्या मित्रांनी अकरावीला तर राणीने फर्स्ट इयर ला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

आता सगळेच आपल्याला नवीन विश्वात दंग झाले होते.

झरझर तिच्या डोळ्यापुढे भूतकाळ येऊन गेल्या .विस्मृतीत गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या.तिला एकदम छान वाटू लागले.

संमिश्र भावनाने तिने ते पार्सल उलटे करून पाहिले. व त्यावरील त्याच्या पोस्टल एड्रेस वर त्याला आभराचे व

विचारपूसचे एक पत्र लिहायला सुरुवात केली. पाठवले देखील.

त्यादिवशी राणीला शांत झोप लागली दुरावलेला भावासारखा मित्र पुन्हा जवळ आला होता.

किती भोळी होती राणी।

दर गुरुवारी ती कोलेजवरून लवकर घरी येत असे. कारण तो दिवस लायब्ररीत जायचा असे.

येताना पोस्टऑफिसला जाणे ही नित्याचे झाले होते. चिंटूचे पत्र तिला नित्य नेमाने येत होते.

राणी ही वेळ काढून त्याला पत्र पाठवत असे. प्रत्यक्षात कधी दोन शब्द नीट न बोलणारा पत्रात मात्र खूप बोले.

त्याच्या बद्दल, त्याच्या हॉस्टेल लाईफ बद्दल, नवीन मित्रांबद्दल पण स्वतःच्या घराबद्दल काहीच बोलत नसे

अजून ही तो घरच्यांच्या वर रागवलेला होता सुट्टीत ही तो येत नसे आणि म्हणूनच

राणी त्याच्याशी अजूनच सौजन्याने बोलत असे .त्यावेळीचे कॉइन बॉक्स चे फोन होते

आता चिंटू पोस्टऑफिसच्या नंबर वर तिला फोन करी कधी राणी त्याला फोन करी.

पण फोनवर बोलणे थोडक्यात होई पत्र पाठवणे मात्र सोपे होते व त्यात बरेच काही सांगता येई.

चेतन आता खूप खुलला होता आणि राणी ही त्याला एक चांगला मित्र समजूनच बोलत होती.

अशातच तिचा वाढदिवस आला त्यादिवशी तिला पोस्टमन अंकलने एक मोठे पार्सल दिले .

मोठ्या आश्चर्याने तिने ते उघडले तर त्यामध्ये एक सुंदर पण महागडे ग्रीटिंग कार्ड होते

जे ओपन केले तर त्यातून सुंदर हॅपी बर्थडे टू यु ची ट्यून वाजू लागे. तिला ते फार फार आवडले

तिने लगेचच त्याला फोन करून आवडले म्हणून सांगितले न थोडे दाटवले ही की एवढे महाग गिफ्ट कशाला रे पाठवलेस?

त्यानंतर मात्र हे चालूच राहिले कधी चॉकलेट तर कधी छोटेसे गिफ्ट तो पाठवत राहिला.

तिला न जुमानता ती तरी कसे अडवणार ना. तो घरी येत नसे.

कोणाशी बोलत नसे फक्त तिच्या सोबतच त्याची वेव्ह लेंथ जुळली होती.

ती ही जमेल तसे त्याची परतफेड करी एखादे छानसे पुस्तक छोटेसे पत्र त्याला पाठवी त्याचे एकटेपण सुसह्य व्हावे

तो चुकीच्या गोष्टी पासून लांब राहावे म्हणून त्याला समजावून सांगे त्याचे ध्येय त्याच्या आईचे स्वप्न असे खूप काही से .

काही दिवसांनी त्याने जरा चुकीचे संकेत दर्शवणारे ग्रीटिंग पाठवले

म्हणजे दोन फुले एकमेकावर झुकलेली किंवा दोन छोटी मुले शेजारी बसलेली.

तिला समजेना पण तिला काहीच बोलता येईना.कुठे चुकले ते ही कळेना

राणी थोडी अस्वस्थ झाली. वाचण्यावरून तिचे लक्ष उडाले. गप गप अशी ती राहू लागली

आईच्या ते लक्षात आले व दृष्ट लागली समजून ती तिला अजूनच जपू लागली.

त्यादिवशीही तिला असेच अस्वस्थ वाटत होते कशातच लक्ष लागत नव्हते

आभाळ ही आले होते. घरचे ही काही निमित्ताने बाहेर गेले होते.

ती विचारात पडली होती. चिंटू ची डेरिंग वाढू लागली होती

जे घडू लागले होते ते तिला नको वाटू लागले होते ती ही तरुण होती

तारुण्याची भाषा तिला चांगलीच समजू लागली होती.येता जाता होणाऱ्या नजरेचे इशारे तिला चीड आणीत होते.

चिंटूच्या बाबतीत मात्र असे काही घडायला नको होते ह्यातून मार्ग कसा काढायचा या विचारात ती हरवून गेली.

भुकेची वेळ उलटून जाऊ लागली.जायच्या आधी आईने तिचे ताट करून ठेवले होते

पण तिने तिकडे पाहिले ही नाही तशीच पडून राहिली.

आज गुरुवार असूनही ती लायब्ररीत गेली नाही पर्यायाने पोस्ट ऑफिसलाहीं कुशीवरून वळून तिने भिंतीकडे पाठ केली

आणि दारावर बेल वाजली कोण असेल म्हणत दार उघडले तर दारात पोस्टमन अंकल उभे.

तिची रजिस्टर वर सही घेऊन जाडसर पार्सल तिला दिले त्यांच्याशी माफक बोलून ती घरात आली

आणि पार्सल उघडल्यावर धक्का बसला काळजाचे ठोके अचानक वाढू लागले.हातापायाला घाम सुटला ..

बरे तर बरे आज घरात कोणी नव्हते

एक सुंदर किसिंग सीन असलेले ते ग्रीटिंग कार्ड होते ज्यामध्ये आई लव्ह यु ची धून वाजत होती.

अचानक एक तिडीक तिच्या मस्तकात गेली. संताप संताप झाला तिच्या जीवाचा.

त्यावेळी हे आई लव्ह यु तीन शब्द फक्त आपल्या प्रियकर किंवा प्रेमीकालाच बोलायचे आता एवढी व्याप्ती नव्हती त्यात.

तिने पटकन त्या कार्डचे तुकडे तुकडे केले व मेणबत्ती घेऊन ते जाळून टाकले…

तोंडावरचा घाम पुसत घटाघटा पाणी प्याली व उशीत डोके खुपसून खूप वेळ रडली.

मागच्या काही गोष्टी तिला आता स्वच्छ दिसू लागल्या. बऱ्याच प्रश्नांचे उत्तर ती शोधत होती.

त्याची उकल झाली त्याच्या वागण्या-बोलण्यातले सूचक अर्थ समजून आले.

अरे आपण तर राजू बरोबर त्याच्या साऱ्या मित्रांना इव्हन ह्याला ही राखी बांधत होतो.

अचानक एकदोन वर्षापासून तो राखीच्या दिवशी गायब राहत असे.

बोलावून ही येत नसे त्यावेळी त्याचे कारण नाही समजले ते आता एकदम उलगडले.

अलगद असे सगळी उत्तरे तिच्या हाती लागली .विचार करकरून राणी थकून गेली.

कोणी आले तर म्हणून आलेली मरगळ घालवण्यासाठी ती उठली

उठून उभी राहिली चेहेऱ्यावर पाणी मारून आरशापुढे येऊन उभी राहिली

आणि टॉवेल ने तोंड पुसत स्वतःचे प्रतिबिंब पाहू लागली आणि आणि

अचानक हसू लागली. होय तिला मार्ग सापडला होता. समजुतदार हा एक मोठा गुण होता तिचा.

कोणी कसे आणि का वागले हे ती आधीसमजून घेई आता ही तिचा तोच गुण एकदम उफाळून वर आला.

तिने पुन्हा एकदा मागे वळून स्वतःला आरशात पाहिले आणि स्वतःशी च म्हणाली, कोणी ही प्रेमात पडावे असेच रूप दिलंय देवाने तुला!

त्यात चिंटूची काय चूक ना ! असेल तर त्याच्या वयाचा परिणाम आहे नाहीतर तो काही असा नाही आणि

सौंदर्य कोणाला आकर्षित करत नाही आपण नाही का फुलाकडे आकर्षित होतो.

लहान सुंदर मूल आपल्याला खेचते जगातील सारी सुंदर गोष्टी सर्वानाच आवडतात त्याला ही आवडले असणार.

पण म्हणून काय त्याचा राग करायचा का? की घरी सांगून स्वतः सोबत त्याला ही बदनाम करायचे?

त्याच्या आईचे स्वप्न आहे तिच्या मुलाने मोठे व्हावे आणि या एका गोष्टीने तो आयुष्यातून उठेल बरबाद होईल.

असे नाही की तिला राग आला नाही कोणाला ही राग यावा असेच होते ते पण ती जशी समजुतदार होती

तशीच प्रसंगावधानी ही होती कसा प्रसंग कश्या रीतीने हाताळावे हे तिला चांगलेच जमे आता ही ती सावरली.

केसांवरून हात फिरवून ती बाहेर निघाली. पोस्टऑफिस बंद झाले होते पण थोडे पुढे एक पब्लिक बूथ होते

तिला आजच हा प्रश्न धसास लावायचा होता. हे ही माहीत होते तिला तो मनात खूप घाबरलेला असेल

आणि तिच्या उत्तराची अपेक्षा असणार, त्याला झोप नसणार ,तो बैचेन असणार आणि

म्हणूनच ती तातडीने आजच त्याला फोन करायला त्याचा नंबर डायल करायला लागली.

कुठून तिच्यात एवढी शक्ती आली होती कुणास ठाऊक! न घाबरता, न बिचकता तिने डायल टोन थांबताच

हॅलो ! रेसिपनिस्ट ला त्याचे नाव सांगितले व प्रतीक्षा करू लागली, आणि

पलीकडून जोरात श्वासाचा आवाज ऐकू आला तिला जाणवले तो कानात जीव ओतून ऐकत होता.

हॅलो चेतन! मी राणी बोलतीये

त्याच्या प्रतिसादाची वाट न पाहता पुढे म्हणाली

Thank यु चेतन ! Thank you फॉर युअर ग्रीटिंग & युअर feelings! & every thing !!

तू प्रेम करतोस माझ्यावर हे किती छान आहे न कुणीतरी आपल्यावर प्रेम करतो

ही भावनाच किती भारी न म्हणून मी तुला धन्यवाद देतेआधी.

प्रेम ही भावनाच सुंदर आहे आपण कोणावरही प्रेम करू लागतो आपल्याच नकळत आणि असेच प्रेम करत रहा

या निसर्गावर त्यातील सर्व सुंदर गोष्टीवर तसेच स्वतःवर ही अभ्यासावर खेळावर घरच्यांवर बघ तुला किती छान वाटेल ते

आणि तिने फोन ठेवून दिला.

तिच्या मनाची धडधड वाढली होती हे बोलताना तिचे हात थरथरत होते. होठ कंपित होत होते.

पण ती बोलली ते सारे शब्द अन मग ती एकटीच खूप खूप रडली.

तो मात्र एका वेगळ्या उत्तराची वाट पाहत होता. त्याला अपेक्षित होते शिव्या, धमकी, राग बरेच काही ऐकायला मिळेल

अशा वेळी तिला काय बोलायचे ते ही त्याने ठरवून ठेवले होते त्याला ती हवी होती

कशी ही साम दाम दंड भेद सर्व नीती वापरून ब्लॅकमेल करायला ही त्याने मागे पुढे पाहिले नसते

पण तिच्या थँकूच्या उत्तराने तो चकित झाला. मनोमन लज्जितही झाला. तो तसा हुशार होता.

मुळात चांगला होता तिला खूप मानत होता तो समजून चुकला अन अभ्यासाला लागला.

आता त्याचे निकाल चांगले येवु लागले होते. ती ही नेहमीप्रमाणेच त्याच्याशी बोलत असे

पण आता विषय होता त्याच्या प्रगतीचा त्याच्या स्वप्नांचा. पुन्हा म्हणून तो विषय त्यांच्यात निघाला नाही.

त्याला सॉरी म्हणायची संधी ही तिने कधी दिली नाही काही झालेच नाही असेच तिचे त्याच्या सोबतचे वागणे होते.
दिवस पुन्हा सरकू लागले दोन वर्षांचा काळ पाहता -पाहता संपला.

आता तो खरोखर मोठा झाला. त्याला चांगल्या कम्पनीचे पॅकेज मिळाले ते ही सेकंड इअरलाच इकडे सगळे जण खुश होते.

आपल्यातला एक मुलगा इतक्या पुढे जातो ही खूप अभिमानाची गोष्ट होती.

अन एकदिवस एक कुरियर आले तिच्या नावाने

उघडून पाहिले तर एक छोटेसे पुस्तक होते नाव होते तिरीप.

पाठवणाऱ्याचे नाव अर्थातच चेतन होते. लिहले होते आधी संपुर्ण पुस्तक वाच व मगच शेवटचे पान बघ.

तिला समजेना तिने ते पुस्तक वाचायला घेतले. वाटले ही तर आपलीच कथा शब्द न शब्द आपल्या जीवनाशी मिळते जुळते.

आणि न राहून तिने शेवटचे पान उघडले आणि ती निःशब्द झाली.

त्यावर लिहले होते

तिरीप जी अंधाराला भेदून खिडकीच्या झडपेतून घरात येते आणि अंधारलेल्या घरात हळूच उजेड करते

आपल्या सोनेरी प्रकाशाने सर्व काही उजळून टाकते तशी

माझ्या आयुष्यातील ती सोनेरी तिरीप तू आहेस दीदी !!!

सगळे क्षणात कसे स्वच्छ सुंदर झाले आता कसे तिला मोकळे मोकळे वाटू लागले. डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते व गालावर हसू.

एक निष्पाप जीव मार्गी लागला होता. केवळ तिच्या समजूतदार व प्रसंगावधानी गुणांमुळे.

ही तर सुरवात होती.

अजून किती जणांच्या आयुष्यात तिला तिरीप बनून जायचे होते हे तिला तरी कोठे माहिती होते.

लेखिका-तबस्सुम काशीद.
पुणे 61
Ph No:9766868842
tabassumkashid19214@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *