Advertisements

Adhirata

Advertisements

अधीरता

अधीरता -लेखिका सौ.रश्मी गिलडा लाहोटी

तिशीची कुमुद आणि तिचा दहा वर्षांचा मुलगा राजू एका गावात रहायचे.

दोन महिन्यांपूर्वी राजूला जवळच्याच गावात असणाऱ्या आश्रम शाळेत टाकले.

एकटी कुमुद उदास राहू लागली, राजूची तिला सतत चिंता वाटायची,आठवण यायची.

दोन महिन्यानंतर राजू घरी येणार होता. कुमुद राजूला भेटण्यासाठी इतकी आतूर झाली होती की,

तो घरी येण्याची वाट पहायच्याऐवजी, हीच गडबडीने त्याला भेटायला त्याच्या दिशेने निघाली.

मनात राजूविषयी वात्सल्य ,ममता ओसंडत होती.

गावाच्या बाहेर एका दाट झाडाखाली एक साधू साधना ध्यान करायला बसला होता.

तिथून घाईत जाताना कुमुदचा पाय त्याने अंथरलेल्या आसनाला लागला.साधू विचलीत झाला, त्याला राग आला.

पण कुमुद राजूला पहाण्यासाठी इतकी आतूर होती की तिला तिची चूकही समजली नाही.

राजूला घेऊन ती त्याच मार्गाने परत येऊ लागली. साधू क्रोधित होऊन म्हणाला, “बाई ,तुला इतकं साधंही ज्ञान नाही का?

मी इथे साधना करतोय ,ध्यान करतोय आणि तु सरळ माझ्या आसनावर पाय देऊन चालतेय?”
कुमुद विनम्रतेने माफी मागते. “महाराज ,क्षमा करावी!

माझा पुत्र बऱ्याच दिवसांपासून दूर होता. मी त्याच्या प्रेमात,चिंतेत इतकी अधीर झाले होते,

त्याला एकदा पहाण्याभेटण्यासाठी इतकी आतूर झाले होते की, मला कोणतंच भान राहिलं नाही.

त्याच्यावर माझं स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असल्यामुळे, त्याला लवकरात लवकर पहाणं याच एका गोष्टीवर माझं लक्ष केंद्रीत होतं,

म्हणून माझ्याकडून ही चूक घडली.”
“माझी अधीरता आपणही समजू शकता, कारण आपलंही त्या ईश्वरावर निस्सीम प्रेम आहे,

त्याला भेटण्यासाठी आपणही अधीर आहात ,म्हणूनच आपण ध्यान करत आहात!”
हे ऐकुन साधू विचलीत झाला.अंतर्मुख होऊन विचार करू लागला,

”खरंच या स्त्रीला जितकं तिच्या मुलासाठी प्रेम आहे,तितकी मला ईश्वराची ओढ आहे का?

नक्कीच नाही!तसं असतं तर मी ईतका एकाग्र असतो की हिचा माझ्या आसनाला पाय लागला हे मला समजलंही नसतं,

मला रागही आला नसता, माझा अपमान झाला असंही वाटलं नसतं.

मी इतका मोठा साधक आहे असा अहंकार मनाला शिवला नसता!

निश्चितच मी पूर्ण मनाने ईश्वरसाधना करत नाहीये.”
जोपर्यंत आपण एकाग्र,तल्लीन होत नाही तोपर्यंत कोणतंही काम चांगल्या गुणवत्तेचं होत नाही.

कोणत्याही कामाविषयी प्रेम ,आपुलकी आवड वाटत नाही तोपर्यंत त्या कार्यात मन एकचित्त कसे होणार?

तन्मयता कशी येणार? कोणतंही काम,अभ्यास असो,व्यवसाय असो किंवा छंद असो,

जोपर्यंत आपण आवडीने करत नाही तोपर्यंत आपल्या मनातला अहंकार,क्रोध,द्वेष ,चिंता,भय

मनाला सतत विचलीत करत रहातात, एकचित्त होऊ देत नाहीत!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *