Advertisements

Manomilan मनोमिलन

Advertisements

मनोमिलन

सूनबाई !

आज ताक करायला घ्या . साय खूप साठली . दही आंबट झालेय …..

सासूबाईंचा सकाळी सकाळी सुचनावजा आदेश !! ….हो सासूबाई …..

शरयू पण एक सुपर वूमन असल्याचा आवेशाने बोलली .

     आजचा रविवार जरा निवांतच होता. ब्रेकफास्ट आवरून थोड्या वेळाने स्वयंपाकाचे पाहू म्हणून 
मधल्या वेळेत पटकन ताक करून घ्यावे आणि 
सासूबाईंना तरंगलेला लोण्याचा गोळा दाखवावा म्हणून शरयू कामाला लागली .....

  गेली 28 वर्षे बँकेची नोकरी, धावपळ यातून नुकतीच तिने VRS घेतली .....
15 दिवस जरा कागदपत्रे सुपूर्द करण्याच्या कामात गेली आणि 
आता मस्तपैकी  रिलॅक्स जीवन जगायच्या मूडमध्ये हवेत तरंगू लागली .....

   विचार करता करता.....पटकन पाच मिनिटात उरकावे तर कसलं काय अन फाटक्यात पाय !....
माझं नशीबच फुटकं म्हणायची वेळ शरयू वर आली ....अचानक हँड ब्लेंडर काम करेंनासे झाले, 
फूड प्रोसेसर नि मान टाकली, फक्त मिक्सर चालू झाला ......
तर त्याचे भांडे पण रागारागात आपटून जरा हतबल झाले होते ......
म्हटलं चला चालू आहे ना ! तसेच त्याला चिरंजीवांनी सेलो टेप लावून दिले .....
पहिला बार उडवला अन जणू काही ती आत बसून लपून कृष्णासारखी दही, 
लोणी खाते असा अवतार झाला ...पूर्ण चेहऱ्यावर दही उडाले ....
चिरंजीवांनी खो - खो हसत, आपल्या बाबांना आवाज दिला .....

     नवरोबा तर काय रविवारी दिवसभर सोफ्यावर बसून आई शी गप्पा! 
(आठवड्याचा बॅकलॉग भरून काढायचा असतो ना! सुट्टीच्या दिवशी या श्रावण बाळाला...आई शी गप्पा मारून).
 न्युज पेपर, आणि TV चा रिमोट हातात घेऊन होते .....

 असो ....ते जरा धावतपळत च किचनमध्ये आले आणि हिचा अवतार बघून .....
बस एक फोटो म्हणून मोबाईल आणायला धावले, 
तसे शरयुने रागारागाने किचनच्या सिंकमध्येच तोंडावर पाण्याचे फवारे मारले .....

  इकडे सासूबाईना अंदाज आला काय घडले याचा!! त्या ही गालातल्या गालात हसत होत्या. 
वरून पुन्हा बसल्याजागी ......अग! सोड ते रवीने घुसळ... पटकन लोणी निघेल बघ, 
शेवटी काय जुने ते सोने कामाला आले ......पण म्हटल्या नाहीत! 
दे मी बसल्या बसल्या करते म्हणून ..... आज जणू काही सगळ्यांनी माझ्याशी असहकार पुकारला होता,....
असे शरयू च्या मनात आले.

     शरयुने ही मग जिद्दीने सगळी कामे उरकली आणि दुपारची वामकुक्षीकडे पळाली. 
आजचा निम्मा दिवस यातच गेला. या गुस्स्यात होती. आणि ठरवले  
आज संध्याकाळी एकटीच जवळच्या पार्कमध्ये जाऊन संध्या ला भेटायचे तसा निरोप तिला सेल वर दिला....

   संध्याकाळी सहा वाजता आवरून शरयू तयार झाली तसे सिद्धार्थ नि अंगावर शर्ट-पँट चढवला....
चला आज कुठे जायचे! ......शरयू ने रागातच त्याला उत्तर दिले....
मी मैत्रिणीला भेटायला एकटीच जाणार तुमचे आपले चालू द्या उगाच त्यात व्यत्यय नको, 
त्याला तेच हवे होते .......तेवढ्यात वाद नको म्हणून शरयू चे सासरे म्हणाले चल मी तुला जाता जाता सोडतो.
पार्क येताच ती उतरली .....सासऱ्यांनी सांगितले सुनबाई तुमच्या गप्पा झाल्या की सांगा, 
मी येताना तुम्हाला न्यायला येतो नाहीतरी मला दोन तास लागणारच आहेत मित्राकडून यायला.......
मनात ती म्हणाली चला,सासऱ्यांची ढाल पुढे करून मस्त दोन तास संध्या बरोबर गप्पा-खाणे उरकू .......

   पार्कमध्ये संध्या वाटच पहात होती शरयूच्या चेहऱ्यावरून तिने अंदाज काढला आज काहीतरी बिनसले घरात! 
आणि आता आपल्याला एक तास निमूटपणे बसून ऐकावे लागणार....
बोलून मोकळी झाली शरयू की मग तिला काय ते सांगू !

    शरयूने दिवसभर घरातल्या घडामोडी अन पाढा वाचला. 
संध्या गप्प बसून ऐकत होती अखेर तिलाच राहवले नाही व ती बोलली......
झाले का शरयू तुझे  बोलून ......
आता थोडे मी काय सांगते ते ऐक ......

     हे बघ शरयू! तुझ्या सासूबाई ही सर्व्हिस करत होत्या.....
सिद्धार्थ सारखा हुशार नवरा तुला मिळाला ...तो ही एकुलता एक मुलगा आहे देशपांडे यांचा! 
आणि तुझा मुलगा अथर्व च्या संगोपनासाठी तुझ्या सासूबाईंनी VRS घेतली हे विसरू नकोस....
त्याही घरचे सगळे पाहून नोकरी करत होत्या. तुझे सासरे तर देवमाणूस शांत आणि संयमी व्यक्तिमत्व! 
उलट तू खूप नशीबवान आहेस ... एवढे वर्ष त्यांनी घरदार, 
अथर्व ला नीट सांभाळले कसलीही कुरबुर न करता आणि आता तुला वाटतेय का 
त्यांना घरात बसून काय काम आहे .....

  आज तूच एवढी चिडतेस पण आता त्यांनाही थोडी विश्रांतीची गरज आहे त्यांच्या वयोमानापरत्वे! 
त्यांच्या जागी तुझ्या आईला ठेवून बघ! काय विचार करशील!! आणि बरं .....
जमेल तश्या त्या तुला मदत करतातच ना! तुम्हा दोघांमध्ये कधी लुडबुड नाही. 
तुला हवा तसा मोकळेपणा, स्वतःची स्पेस मिळतेच ना! 
मग आता थोडी कामे पडली तर चिडू नकोस. तू आनंदी राहिलीस घरात, 
तर .....घरदार सुखी-समाधानी! घरात भांड्याला-भांडे लागता काम नये .....

     तशा त्या आणि बाबा ही आधुनिक विचारसरणीचे आहेत. असे कुटुंब मिळायला भाग्य लागते. 
तू एवढी वर्षे सर्व्हिस करत असल्याने घरात कामाच्या जबाबदाऱ्या तुझ्यावर अशा जास्त कधी पडल्या नाहीत 
म्हणून तुझी चिडचिड होतेय बाकी काही नाही......
उलटपक्षी आता दोघी सासू-सूना मस्त एन्जॉय करा एकमेकींचा सहवास.....
एखादा सिनेमा,नाटक,प्रदर्शन बघायला जात जा!! काही वेळेस त्यांनाही शॉपिंग ला ने तुझ्या बरोबर! 
आणि हो जरा थोडे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढव! बघ कशा त्या खुश होतील! ......
शेवटी काय ग! बाई ची जात दोन प्रेमाचे शब्द ऐकायला आसुसलेली असते!! बघ पटतंय का मी काय सांगते ते!

   तेवढ्यात शरयूला बाबांचा फोन आला मी निघतोय जाऊया का घरी! तसा .....
शरयूने संध्याचा निरोप घेतला आणि डोळ्यात पाणी आणून बोलली .....
संध्या थँक्स डिअर आज खरंच तू माझे डोळे उघडलेस! 
तुझा हा मोलाचा सल्ला मी  चांगलाच लक्षात ठेवीन !

 ......आणि हो या सुट्टीत आपण वीणा वर्ल्ड च्या वुमन स्पेशल टूर वर जाऊया!! आपण दोघी, 
आपल्या सासवा आणि आई ...... दोघी मैत्रिणी एकमेकांचा निरोप घेऊन निघाल्या .....

   शरयू प्रसन्न मनाने घरी परतली तर तिच्या सासूबाई आणि त्यांचा श्रावणबाळ मिळून बटाटेवडे करत होते. 
दार उघडताच वड्याचा घमघमाट सुटला!! तिने धावतच येऊन सासूबाईंना मिठी मारली. 
तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते.
सिद्धार्थ,बाबा,आणि अथर्व या दोघींचा मनोमिलन सोहळा कौतुकाने पहात होते. 

  ........I am sorry Aai!! तशा तिच्या सासूबाईंनी हळूवार डोळे पुसत तिला आदेश दिला....
चल आता पटकन गरमागरम वडे खाऊन घे! भूक लागली असेल तुला! 
दिवसभराचा ताण-तणाव दूर होऊन अख्खी फॅमिली गप्पात रंगून गेली.....
आणि सिध्दार्थने आईकडे बघून हळूच डोळे मिचकावले!!

--लेखिका-सौ.राजश्री भावार्थी, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *